नागपूर : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाला ऐतिहासिक यश मिळत असताना महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. गुजरात निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, गुजरातचे निकाल जरी भाजपाच्या बाजूनं आज दिसत असले तरी ते लोकशाहीनं नव्हे, तर दबावतंत्राच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत. गुजरातमध्ये खरी परिस्थिती भयावह आहे. आमच्याकडे जे काही रिपोर्ट आले आहेत ते धक्कादायक आहेत. तिथं तरुणांना व्यसनाधीन आणि ड्रग्जच्या आहारी नेण्याचं पाप भाजपा करत आहेत. जसं उडता पंजाब आपण पाहिलं तसं उडता गुजरात झालं आहे, असं नाना पटोले म्हणाले.
..हे लोकशाहीसाठी घातक
भाजपाकडून राजकारण करत जे धोरण अवलंबलं जात आहे, त्याचं उदाहरण गुजरातमध्ये पाहायला मिळत आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे. मतदानाचा कौल त्यांच्या बाजून आहे, मात्र दबावतंत्र आणि भीतीच्या माध्यमातून हे सर्व झालं आहे. गुजरातच्या जनतेनं कौल दिला आहे. आम्ही आमच्या पराभवाचं आत्मपरिक्षण करू. गुजरातमध्ये भाजपाचं दबावतंत्र चाललं असलं तरी हिमाचलमध्ये दबावतंत्र चाललेलं नाही. काँग्रेसला तिथं चांगलं यश मिळत आहे. तिथं आमचंच सरकार स्थापन होईल, असंही नाना पटोले म्हणाले.