महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसचा पाठिंबा; वाचा काय म्हणाल्या सोनिया गांधी

नवी दिल्ली : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवसाचे कामकाज सुरू झाले आहे. कायदा मंत्री अर्जुन मेघवाल यांनी मंगळवारी महिला आरक्षण विधेयक (नारी शक्ती वंदन कायदा) मांडले होते. यावर लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर आज चर्चा सुरू झाली आहे. यावर बोलतांना काँग्रेस खासदार सोनिया गांधी यांनी महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेस पाठिंबा देत असल्याची घोषणा केली आहे.

महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत बोलताना काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या की, ‘महिला आरक्षण हे माझे पती राजीव गांधी यांचे स्वप्न होते. नंतर ते पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांच्या सरकारने मंजूर केले. आज त्याचा परिणाम म्हणजे देशभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून 15 लाख महिला नेत्या निवडून आल्या आहेत. राजीव गांधींचे स्वप्न आतापर्यंत अर्धेच पूर्ण झाले आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर हे स्वप्न पूर्ण होणार आहे.’

पुढे बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या की, ‘स्त्री ही आपल्या महान देशाची जननी आहे. प्रत्येक ठिकाणी महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढल्या आहेत. स्त्री हे त्यागाचे प्रतिक आहे. स्त्रीच्या सहनशीलतेचे मोजमाप करणे कठीण आहे. स्त्रियांमध्ये समुद्रासारखा संयम असतो. महिला आरक्षण विधेयक सर्वप्रथम काँग्रेसने मंजूर केले. या विधेयकाला माझा पाठिंबा आहे,’

महिला आरक्षण बिल लवकरात लवकर लागू करण्याची मागणी
महिला आरक्षण विधेयक पास झालं याचं आम्हाला आनंद आहे. मात्र याविषयी एक चिंताही आहे. मागच्या १३ वर्षांपासून भारतीय स्त्रिया आपल्या राजकीय आरक्षणाची वाट बघत आहेत. तसंच त्यांना आता आणखी काही दिवस वाट बघावी लागणार आहे? किती वर्षे वाट बघावी लागणार? २ वर्षे, ४ वर्षे, ८ वर्षे? काँग्रेस म्हणून आमची मागणी आहे की महिला आरक्षण विधेयक लवकरात लवकर लागू करावं. सरकारला जी पावलं उचलायची आहेत ती त्यांनी उचलावीत. राजकारणात स्त्रियांचं महत्वाचं योगदान आहे. आत्ताची वेळ ही सर्वात योग्य वेळ आहे. या बिलाला आणखी विलंब करु नका. तातडीने हे बिल मंजूर करा अशी मागणी सोनिया गांधींनी केली आहे.

काँग्रेसने २०१० मध्येच महिला आरक्षण बिल आणलं होतं : खरगे
हे सरकार जे महिला आरक्षण बिल आणतंय ते काँग्रेसने २०१० मध्ये आणलं होतं. लोकसभेत ते टिकलं नाही. आत्ताचं सरकार महिलांसाठी काही नवं करत नाही. २०१४ पासून यांचं सरकार आहे. यांना बिल आणायचं असतं तर आधीच आणलं असतं असं म्हणत मल्लिकार्जुन खरगेंनी मोदी सरकारवर टीका केली आहे.