बंगळूरु : कर्नाटक मधील काँग्रेस सरकार रामनगर जिल्ह्याचे नाव बदलणार आहे. याबाबतचा प्रस्ताव उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठविला आहे. नामांतराच्या या प्रस्तावाला भाजपाने तीव्र विरोध केला आहे. रामनगर जिल्ह्याच्या नावात राम असल्याने काँग्रेस सरकार हे नाव बदलत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
कर्नाटक सरकारमधील उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी रामनगर जिल्ह्याचं नाव बदलून बंगळुरू दक्षिण असं करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांच्याकडे पाठवला आहे. शिवकुमार यांनी रामनगर जिल्ह्याचं नाव बदलण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्याची ही दुसरी वेळ आहे. शिवकुमार आणि इतर काही जणांनी सिद्धारामैय्या यांच्याकडे एक पत्रक देत रामनगर जिल्ह्याचं नाव बदलून बंगळुरू दक्षिण करावं, अशी विनंती केली आहे.
रामनगर जिल्ह्याच्या नामांतरासाठी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रकावर डी. के. शिवकुमार यांच्यासह १३ जणांनी सह्या केल्या आहेत. दरम्यान, भाजपा नेते शहजाद पुनावाला यांनी सांगितले की, सध्याच्या काँग्रेस पक्ष हा हिंदू धर्माचा द्वेश करतो. तसेच या पक्षाची रामविरोधी मानसिकता शिगेला पोहोचली आहे. आपण राम जन्मभूमी आंदोलनाला पराभूत केले, असा दावा राहुल गांधी यांनी हल्लीच केला होता. आता डी. के. शिवकुमार यांना रामनगर नाव नावडतं झालं आहे कारण ते श्री रामांच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे, असा आरोप त्यांनी केला.