काँग्रेसला बसणार आणखी मोठा धक्का! पुन्हा एक नेता पक्ष सोडण्याच्या मार्गावर?

मुंबई : काँग्रेस पक्षातील अनेक मोठे नेते एकामागे एक पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसचा आणखी एक मोठा नेता पक्षापासून दूर जाताना दिसत आहे. आपल्याच पक्षातील नेत्याच्या विरोधात या नेत्याने आता दंड थोपटले आहेत.

सुत्रानुसार, काँग्रेस हायकमांडचा आदेश झुगारुन सचिन पायलट जयपूरमध्ये उपोषणाला बसले आहेत. सचिन पायलट यांनी आता माघार घेणार नसल्याची भूमिका घेतलेली दिसत आहे. त्यामुळे काँग्रेस हायकमांड आता काय निर्णय घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

सचिन पायलट जयपूरमधील ‘शहीद स्मारक स्थळ’ येथे उपोषणाला बसले आहेत. मागे महात्मा गांधींचा फोटो असलेला मोठा बॅनर आहे. पोस्टर व्यतिरिक्त खाली दोन महापुरुषांचे फोटो देखील लावण्यात आले आहेत, त्यापैकी एक महात्मा गांधींचा आणि दुसरा ज्योतीबा फुलेंचा आहे. दोन्ही महापुरुषांचे चित्र नुसते लावलेले नाही, तर त्याला राजकीय महत्त्वही आहे.

गांधींच्या माध्यमातून भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याचा संदेश असेल, तर फुलेंच्या माध्यमातून राजकीय समीकरण जुळवण्याचा डाव मानला जात आहे. ज्योतीबा फुले यांनी दलित-शोषित-मागासांच्या हक्कांसाठी सामाजिक न्यायासाठी लढा दिला. सचिन पायलट हे देखील दलित, मागास आणि आदिवासी समाजाच्या मदतीने पुढे जाण्याची तयारी करत आहेत.

पोस्टरमध्ये गांधी घराण्यातील कोणत्याही नेत्याचे किंवा पंडित जवाहरलाल नेहरूंचा देखील फोटो नाही. पोस्टरमध्ये सोनिया गांधींपासून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी कोणालाच स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे आता पुढे काय होणार याचीच चर्चा रंगली आहे.