मुंबई : राष्ट्रवादीतून बंड करत अजित पवारांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त झाले होते. या जागेवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडूनही दावा करण्यात येत होता. गेल्या काही महिन्यांपासून विरोधीपक्ष नेते पदाचा तिढा सुटत नव्हता. मात्र आता महाविकास आघाडीत आता सर्वाधिक सदस्य काँग्रेसचे असल्याने विरोधी पक्षनेते पदही काँग्रेसला देण्यात आले आहे. विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेता असतील असा काँग्रेसने निर्णय घेतला आहे.
राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी दुसऱ्यांदा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांची निवड होत आहे. याबाबत काँग्रेसकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु, विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी याबाबत ट्वीट केलं आहे. तर, विधिमंडळ नेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. आता, काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्षांना विरोधी पक्षनेतेपदाची निवड करण्याबाबत पत्र दिले जाईल. त्यानंतर, विधानसभा अध्यक्ष विरोधी पक्षनेत्याच्या निवडीची घोषणा करतील.
२०१४ ते २०१९ या कार्यकाळात अखेरच्या तीन महिने विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळाली होती. त्यावेळी, राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपसोबत गेल्यामुळे त्यांना ही संधी मिळाली होती. आता, दुसऱ्यांदा त्यांना विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळत आहे. त्यामुळे, काँग्रेस पक्षात वडेट्टीवार यांचं स्थान वाढल्याचं दिसून येतं.
दरम्यान, यापूर्वी विरोधी पक्षनेतेपद पहिले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीमुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तथा उद्बव ठाकरे यांच्या शिवसेनेचे संख्याबळ कमी आहे. आता, काँग्रेसकडे संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षनेतेपद काँग्रेस पक्षाकडे आले असून विजय वडेट्टीवार यांचे नाव निश्चित झाले आहे.