मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवृत्ती शरद पवारांनी जाहीर केली. त्यानंतर सुप्रिया सुळे नव्या अध्यक्षा म्हणून चर्चा रंगली. सुप्रिया सुळे अध्यक्षा होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सुप्रिया सुळे या बुधवार, दि. ३ मे रोजी कर्नाटकातील निपाणी येथे प्रचाराला जाणार होत्या. मात्र, त्यांनी तडकाफडकी हा दौरा रद्द केला. त्यानंतर त्यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सुत्रे जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. तसे झाल्यास राष्ट्रवादीला पहिल्यांदाच महिला अध्यक्ष मिळणार आहे. याशिवाय राज्यातील राजकीय पक्षाची पहिली महिला अध्यक्ष होण्याचा मानही सुप्रिया सुळे यांना मिळणार आहे.
सुप्रिया सुळे या शांत स्वभावाच्या. माध्यमांसमोर कसं बोलायचं आणि किती बोलायचं याचं अचूक ज्ञान त्यांना आहे. प्रशासन आणि सत्ताकारणाची त्यांना उत्तम समज आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अधिक आहे. कर्नाटक निवडणुकीनंतर चित्र स्पष्ट होणार असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय पवारांकडे अध्यक्षपद ठेवून सुप्रिया सुळे कार्याध्यक्षा म्हणूनही घोषित केल्या जाऊ शकतात.
सुप्रिया सुळे या बारामतीच्या विद्यमान खासदार आहेत. शरद पवार यांच्या त्या कन्या असून गेले अनेक वर्षे त्या सक्रीय राजकारणात आहेत. २०११ मध्ये त्यांनी स्त्री भ्रूण हत्येविरोधात राज्यव्यापी मोहीम सुरू केली. सप्टेंबर २००६ मध्ये महाराष्ट्रातून त्या राज्यसभेवर निवडून आल्या होत्या. त्या मुंबईतील नेहरू सेंटरच्या विश्वस्त आहेत. याव्यतिरिक्त त्या अन्य ९ संस्थांच्या विश्वस्त आहेत. २०१२ मध्ये सुळे यांच्या नेतृत्वाखाली तरुणींना राजकारणात व्यासपीठ देण्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेस नावाची शाखा स्थापन करण्यात आली.
२०१४ मध्ये ASSOCHAM च्या लेडीज लीगने दशकातील उत्कृष्ट महिला म्हणून सुप्रिया सुळे यांना सन्मानित केले. त्या माहिती तंत्रज्ञानावरील स्थायी समिती आणि मनुष्यबळ मंत्रालयाच्या सल्लागार समितीच्या सदस्या आहेत. अलीकडेच, सुळेंना सामाजिक सेवेसाठी ऑल लेडीज लीगतर्फे ‘मुंबई महिला ऑफ द डिकेड अचिव्हर्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे होते.
बारामतीच्या तीन वेळा खासदार सुप्रिया सुळे यांनी १७ व्या लोकसभेच्या पहिल्या सत्रात आपल्या कामगिरीचा ट्रॅक रेकॉर्ड कायम ठेवला आहे. संसदेच्या सभागृहात उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची राष्ट्रीय सरासरी ८८ टक्के आहे, तर लोकसभेच्या या अधिवेशनात सुळे यांची उपस्थिती ९७ टक्के होती.
अन्य उल्लेखनीय कामगिरी
IL&FS च्या मदतीने बारामतीतील २५०० शाळांना मोफत पुस्तके पुरवणे.
एशियाटिक सोसायटी, मुंबईचा द्विशताब्दी विशेष वारसा “एशियाटिक वॉक” कार्यक्रम.
परिवर्तन २००६ : महिलांना त्यांच्या उत्पादनांच्या व्यवसायाद्वारे कृषी आणि बचत गट (SHG) सक्षमीकरणात मदत करणारा कार्यक्रम.
ग्रामीण महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या मदतीने मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रसार करण्याच्या प्रकल्पावर काम करत आहे.
रस्त्यावरील मुलांच्या उत्थानासाठी काम करणारी संस्था “डोअर स्टेप स्कूल आणि “सपोर्ट”
चेतना अपंगमती विकास संस्था, कोल्हापूर