रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यावरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. यासंदर्भात छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी आज रायगडावरून राज्यपाल आणि भाजपाच्या संबंधित नेत्यांवर टीकास्र सोडलं. लवकरच एक तारीख ठरवून आपण सगळ्यांनी मुंबईतल्या आझाद मैदानात जायचंय. आज आपण आपल्या सगळ्यांची अस्मिता असणार्या शिवाजी महाराजांचा सन्मान राखण्यासाठी एक निर्धार केला आहे. कुठल्याही प्रकारे यात राजकारण येऊ देऊ नका. शिवाजी महाराजांचा अवमान यापुढे कुणी करूनच दाखवावा. काय होईल, ते आपल्या परीने आपण बघूनच घेऊ, अशी घोषणा उदयनराजे भोसलेंनी यावेळी केली.
आज शिवाजी महाराजांचाच अनादर महाराष्ट्रात होतोय. त्यांची विटंबना होतेय. चित्रपट असेल, लिखाण असेल, वक्तव्य असेल..आपण सगळे ते शांतपणे ऐकून घेतलं. काहीजण त्यातून सोयीनुसार अर्थ काढून घेत असतात. काहीजण त्याचं प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे समर्थन करण्याचं धाडस दाखवतात. कुणालाही महाराजांचा अवमान करण्याचा अधिकार नाही. असा वक्तव्यांना दुजोरा दिला जातो आणि आपण सगळे मूग गिळून पाहात बसतो. आजवर हीच सगळ्यात मोठी आपल्या सगळ्यांची चूक झाली. हे सगळं आपल्या अंगवळणी पडलंय. हे या देशाला घातक आहे, असं उदयनराजे भोसले यावेळी म्हणाले.
काय वेळ आलीये? महाराजांचा जयघोष करण्यासाठी आलो असतो, तर वेगळा आनंद झाला असता. पण आपण काय करतोय? शिवसन्मानाचा निर्धार करण्याची वेळ आपल्यावर आलीये. या लोकांना लाजा वाटल्या पाहिजेत की वैयक्तिक स्वार्थासाठी लोकांच्या विचारात तुम्ही बदल केला. शिवाजी महाराजांचा आपण सन्मान करायला हवा हे बोलावं लागतं. ही बोलायची गरज आहे? ते अंतकरणातून आलं पाहिजे, अशा शब्दांत उदयनराजेंनी आपली व्यथा बोलून दाखवली. राज्यपालांवर टीका करतांना ते म्हणाले की, ही राजकीय मंडळी स्वत:च्या स्वार्थासाठी त्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करतात. लाज वाटली पाहिजे. मला राज्यपालांचं नाव घेऊन त्याला मोठं करायचं नाहीये. ते पद महत्त्वाचं आहे, अशा शब्दांत उदयनराजे भोसलेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर हल्लाबोल केला.