---Advertisement---
जळगाव : निविदेसाठी भरलेली ३५ हजारांची अनामत रक्कम परत मिळण्यासाठी पाच हजार रुपयाची लाच स्वीकारताना महापालिकेच्या आरोग्य विभागातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. लिपिक आनंद जनार्दन चांदेकर (वय ३७) याच्यासह कंत्राटी शहर समन्वयक राजेश रमण पाटील (वय ३५) यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
तक्रारदार हे कर सल्लागार असून, एका संस्थेतर्फे नव्याने बांधण्यात आलेल्या आधुनिक वातानुकुलीत पे अँड युज शौचालयाच्या टेंडर प्रक्रियेत सहभागी झाले होते. संस्थेकडून ३५ हजार रुपयांची अनामत रक्कम भरल्यानंतरही टेंडर मिळाले नाही.
ही अनामत रक्कम परत मिळविण्यासाठी अर्ज सादर केला लिपिक चांदेकर याने तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने मंगळवारी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली.
पडताळणीदरम्यान चांदेकरने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली व ही रक्कम सहकारी राजेश पाटील याच्याकडे देण्यास सांगितले. मात्र, सापळा कारवाईदरम्यान तक्रारदाराने ५ हजार रुपये थेट चांदेकर याच्या पंचासमक्ष टेबलावर ठेवले असता त्याने स्वतः रक्कम स्वीकारली.