मुंबई : गेल्या वर्षभरात काही ना काही वक्तव्यांवरून राज्यपाल कोश्यारी हे अडचणीत आले आहेत. आताही छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात राज्यपाल कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यात विरोधी पक्षाने आंदोलने सुरु केली आहेत. अनेक नेत्यांनी कोश्यारी यांच्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे उद्या आणि परवा म्हणजेच २४-२५ नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली दौर्यावर जाणार असून, ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रातील उच्चपदस्थांच्या भेटीगाठी घेण्याची शक्यता आहे. या भेटीच्या पार्श्वभूमीवर कोश्यारी यांची राज्यपालपदावरुन गच्छंती होणार? यावर पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.
गेल्या वर्षभरात काही ना काही वक्तव्यांवरून राज्यपाल कोश्यारी हे अडचणीत आले आहेत. त्यांच्या विधानावरून भाजपाचीही कोंडी होत असल्याची परिस्थिती अनेकवेळा निर्माण झाली आहे. आताही राज्यपाल कोश्यारी यांनी शिवरायांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना राज्यपालपदावरुन हटवावे, अशी मागणी महाविकास आघाडीमधील नेत्यांनी केली आहे. त्यावर छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वाचेच कायम आदर्श आहेत, अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली मात्र हा वाद शमायला तयार नाही. आता दिल्लीकडून बोलावणे आल्यामुळे राज्यपाल कोश्यारी यांच्यावर कारवाई होते का त्यांना पुन्हा अभय मिळते? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
कोश्यारी यांच्यावर माहभियोगाची कारवाई करण्यात यावी यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका करण्यात आली आहे. दीपक जगदेव यांनी ही याचिका दाखल केली आहे. भारतीय राज्यघटनेनुसार, उच्च न्यायालयाने पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाची स्थापना करावी आणि अनुच्छेद ६१ आणि १५६ अनव्ये राज्यपालांना हटवण्याचा निर्णय लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्य विधानमंडळाच्या अध्यक्षांना घ्यावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, जोतिबा फुले यांचा अवमान करून महाराष्ट्रात दंगलीसदृश परिस्थिती निर्माण करण्यासाठी चिथावणी देणार्या राज्यपालांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, असी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.