राम मंदिराबाबत पश्चिम बंगालच्या आमदारचे वादग्रस्त विधान, म्हणाले…

कोलकता : रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी केवळ भारतातून नव्हे तर जगभरातील रामभक्तांचे पाऊलं अयोध्येकडे वळत आहेत. मात्र विरोधीपक्ष राममंदिरावरुन देखील राजकारण करतांना दिसत आहेत. त्यातच आता तृणमूल काँग्रेसचे आमदार रामेंदू सिन्हा रॉय यांनी एका रॅलीत बोलताना अयोध्येत बांधलेल्या राम मंदिराचे वर्णन ‘अपवित्र स्थळ’ असे केले आहे. याबाबतचा त्यांचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील राजकीय घडामोडी सुरूच आहेत. पण दरम्यान, राम मंदिराबाबत टीएमसी आमदाराने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून दोन्ही पक्ष आमने-सामने आले आहेत. अयोध्येतील प्रभू श्रीरामांचे मंदिर हे कोट्यावधी भाविकांचे श्रध्दस्थान आहे. मात्र तृणमूल काँग्रेसने त्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याने मोठं वादळ उठलं आहे.

व्हिडीओमध्ये ते म्हणतात की, ‘मंदिर बांधले गेले आहे आणि कोणत्याही हिंदूने राम मंदिरात पूजा करण्यासाठी जाऊ नये.’ टीएमसी नेत्याने पुढे म्हटले आहे की, ‘जर पंतप्रधान मोदी ब्राह्मण नाहीत तर ते प्राणप्रतिष्ठा कसे करू शकतात?’ यावर भाजपाने पलटवार केला आहे. भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी प्रत्युत्तर दिले आहे, “ही टीएमसी नेत्यांची भाषा आहे. त्यांनी प्रभू रामाबद्दल TMC नेतृत्वाचा आदर दाखवला आहे.” टीएमसी आमदाराच्या टिप्पणीमुळे जगभरातील हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, असा इशाराही भाजपाने दिला आहे.