सोशल मीडियावर शरद पवारांविषयी वादग्रस्त लिखाण; तरुणाला अटक

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सोशल मीडियात आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी विशाल गोर्डे या ३३ वर्षीय तरुणाला बेलापूर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. विशालने एमबीएचं शिक्षण घेतले असून गोर्डे याला वाशी न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. त्यानंतर न्यायालयाने त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटाच्या प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. “आदरणीय शरद पवार साहेब यांच्यावर फेसबुकद्वारे आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या विशाल गोरडे याच्याविरूद्ध आज तक्रार दाखल केली. लवकरात लवकर याला अटक करून शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली, नाहीतर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल,” असा इशारा घाणेकर यांनी दिला होता. त्यानंतर विशालला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान आपण मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचं विशाल गोर्डेने सांगितलं आहे. तसंच “मी रबाळे येथील एका खासगी कंपनीत नोकरी करत होतो. मात्र कोरोना महामारीच्या काळात २०२१ मध्ये माझी नोकरी गेली. त्यानंतर मी कंपन्यांना कामगार पुरवण्याचं काम कर होतो. मात्र त्यातून फारसे पैसे मिळत नव्हते. त्यामुळे मी नैराश्यात गेलो,” असा दावा विशालने केला आहे.