इंडिया आघाडीत संयोजक पदावरुन वाद; संजय राऊत म्हणाले ‘हे बाहेर…’

मुंबई : मुंबईत I.N.D.I.A आघाडीची बैठक होत आहे. ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी दोन दिवसांची बैठक होत आहे. या बैठकीत संयोजक पदावरुन वाद सुरु असल्याची माहिती सुत्रांकडुन मिळाली होती. यावर राऊतांना विचारले असता ते म्हणाले, “संयोजक पदावर वाद आहेत हे बाहेर तुम्हाला कोणी सांगितलं? बैठक तर आत आहे. आतली चर्चा बाहेर आली कशी? असा सवाल करतानाच काल अनौपचारिक चर्चा होती. आज महत्त्वाची चर्चा होणार आहे. 28 पक्षांची इंडिया आघाडी आहे. यात सर्व पक्षांना सामावून घेणार आहोत. कोणत्याही मुद्द्यावर वाद नाही.” असं स्पष्टीकरण राऊतांनी दिलं.
देशात वन नेशन वन इलेक्शनचा फॉर्म्युला लागू होण्याची शक्यता आहे. यावर राऊतांना विचारले असता ते म्हणाले, “केंद्र सरकारने वन नेशन, वन इलेक्शनचा नवा फुगा हवेत सोडला आहे. काय झालं जम्मूत? आधी जम्मूत इलेक्शन घ्या. मणिपूरमध्ये घ्या. वन नेशनच्या आधी फेअर इलेक्शन घ्या. भ्रष्ट इलेक्शन कमिशन बाजूला करा. भ्रष्ट इलेक्शन कमिशन असेपर्यंत देशात वन नेशन वन इलेक्शन होणार नाही.”
“वन नेशन वन इलेक्शन वो क्या होता है भाई? हा देश एक आहे ना? वेगळा आहे का? या देशात कोणी वेगळी गोष्ट कशी काय करू शकतो? हा वन नेशनच आहे ना? त्यात काही शंका आहे का? कुणाला शंका आहे? निवडणुकाही एक होतात. वन नेशन वन इलेक्शन ठीक आहे. पण त्या ऐवजी फेअर इलेक्शन घ्या. हा आमचा नारा आहे. वूई वाँट फेअर इलेक्शन. ते घेत नाही म्हणून वन नेशन इलेक्शन सुरू केलं आहे. लोकसभा निवडणुका पुढे ढकलण्याचं हे षडयंत्र आहे.” असं राऊत म्हणाले.