IPL 2025 : भारत-पाकिस्तान तणावामुळे आयपीएल हंगाम काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आला होता. पण आता तो १७ मे पासून पुन्हा सुरू होणार आहे. मात्र काही विदेशी खेळाडूंनी पुन्हा भारतात परतण्यास नकार दिल्यामुळे अनेक संघांना धक्का बसला आहे. अशात पर्याय म्हणून दिल्ली कॅपिटल्सने ऑस्ट्रेलियन खेळाडू जॅक फ्रेझर-मॅकगर्कच्या जागी बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजूर रहमानला संघात समाविष्ट केले आहे. मात्र दिल्ली कॅपिटल्सचा हा निर्णय चाहत्यांना अजिबात आवडलेला नाही. मुस्तफिजूर रहमानचा संघात समावेश झाल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांचा प्रचंड संताप दिसून येत आहे. अनेक चाहते दिल्लीच्या सामन्यांवर बहिष्कार टाकण्याची मागणीही करत आहेत.
युद्धबंदीनंतर, बीसीसीआयने स्पर्धेतील उर्वरित सामन्यांचे नवीन वेळापत्रक जाहीर केले. परदेशी खेळाडूंच्या परतण्याबाबत अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, बोर्डाने सर्व संघांना तात्पुरत्या बदली खेळाडूंवर स्वाक्षरी करण्याची परवानगी दिली होती. ऑस्ट्रेलियन खेळाडू जॅक फ्रेझर-मॅकगर्कने भारतात परतण्यास नकार दिल्यानंतर, या नियमानुसार, दिल्ली कॅपिटल्सने १४ मे रोजी बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला संघात सामील केले.
या निर्णयाबाबत चाहत्यांचे म्हणणे आहे की, बांगलादेशात शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचारांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. बांगलादेशमध्ये, मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस आणि कट्टरपंथी मुस्लिम संघटनांकडून हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. तिथली मंदिरे आणि मूर्ती उद्ध्वस्त करण्यात आल्या आणि महिलांचा छळ करण्यात आला. यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे आणि ते आयपीएलमध्ये कोणत्याही बांगलादेशी खेळाडूच्या सहभागाला विरोध करत आहेत. याआधीही चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली, ज्यामुळे आयपीएल २०२५ च्या लिलावात १२ बांगलादेशी खेळाडू विकले गेले नाहीत.
दिल्ली कॅपिटल्सला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल
बांगलादेशी खेळाडूच्या प्रवेशानंतर सोशल मीडियावर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. चाहत्यांनी संघाच्या सामन्यांवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली आहे. बांगलादेशी खेळाडूला परवानगी का देण्यात आली असा प्रश्नही बीसीसीआयला विचारला आहे. मुस्तफिजूर रहमानला खेळण्यासाठी बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून अजूनही ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) आवश्यक आहे, जे अद्याप जारी केलेले नाही.