नवी दिल्ली : विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या ‘इंडिया’ (INDIA)च्या मित्रपक्षांमध्ये जागावाटपावरून वाद वाढला आहे. यामुळे काँग्रेसची डोकंदूखी वाढली आहे. महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, दिल्ली आणि पंजाब, बिहार, यूपी मध्ये जागावाटपावरुन काँग्रेस व प्रादेशिक पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळेच मुदत संपून आठवडा उलटूनही एकमत होऊ शकले नाही.
इंडिया आघाडीत २८ पक्ष मित्रपक्ष आहेत. आघाडीतील विरोधी पक्षांची दिल्लीत १९ डिसेंबर रोजी चौथी बैठक झाली. यामध्ये सर्व पक्षांनी आपापल्या राज्यात जागावाटपाचा फॉर्म्युला तयार करून त्यावर एकमत करण्याची अंतिम तारीख ३० डिसेंबर होती. मात्र कोणताही पक्ष तडजोड करण्यास किंवा मागे हटण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक पक्ष आपल्या राज्यात जास्तीत जास्त जागांवर निवडणूक लढवण्याचा विचार करत असल्याने आघाडीतील पक्षांमध्ये राज्यस्तरावर वाद सुरू झाला आहे.
गुरुवारी, काँग्रेस नेतृत्वाने राज्य पदाधिकाऱ्यांना सांगितले की, आगामी लोकसभा निवडणुकीत पक्ष २५५ जागांवर लक्ष केंद्रित करेल. म्हणजेच पक्षाने या जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्या जिंकण्यायोग्य मानतात. मात्र, २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. काँग्रेस लवकरच लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ४२१ जागा लढवल्या आणि ५२ जागा जिंकल्या. काही राज्यांमध्ये काँग्रेसनं आघाडी केली होती. त्यात बिहारमध्ये RJD, महाराष्ट्रात NCP, कर्नाटकात JD(S), झारखंडमध्ये JMM आणि तामिळनाडूमध्ये DMK सोबत काँग्रेस रिंगणात होती. बिहारमध्ये ४० पैकी फक्त ९ जागा, झारखंडमध्ये १४ पैकी ७ जागा, कर्नाटकात २८ पैकी २१, महाराष्ट्रात ४८ पैकी २५ आणि तामिळनाडूत ३९ जागांपैकी ९ जागा काँग्रेसनं लढवल्या. उत्तर प्रदेशात काँग्रेसने ८० पैकी ७० जागा लढवल्या होत्या.