तरुण भारत लाईव्ह । १२ मे २०२३। संध्याकाळी भूक लागल्यावर काहीतरी वेगळं खायला हवं असत. तर वेगळं असं काय करावं असा प्रश्न पडतो तर अशावेळी तुम्ही कोथिंबीर वडी ट्राय करू शकता. कोथिंबीर वडी घरी कशी बनवली जाते हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
साहित्य
१ कोथिंबीर जुडी, २०० ग्रॅम चण्याचं पीठ, १०० ग्रॅम तांदळाचं पीठ, २५ ग्रॅम सफेद तीळ, दोन छोटे चमचे लाल तिखट, एक छोटा चमचा हळद, एक छोटा चमचा जिरं, १० ते १५ लसूण पाकळ्या, एक चमचा तेल, स्वादानुसार मीठ.
कृती
प्रथम कोथिंबीर बारीक चिरून घ्या. चिरलेली कोथिंबीर चाळणीमध्ये घेऊन स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी. स्वच्छ धुतलेली कोथिंबीर एका परातीत घ्या. मग त्यात चण्याचं पीठ, तांदळाचं पीठ, सफेद तीळ, लाल तिखट, हळद, ठेचलेल्या लसूण पाकळ्या, स्वादानुसार मीठ आणि एक चमचा तेल टाकून सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून, घट्ट मळून घ्या. मिश्रण तयार झाल्यानंतर त्याचे रोल तयार करा. नंतर कोथिंबीर वडीचे रोल कुकरच्या भांड्यात ठेवून, कुकरच्या ८ ते १० शिट्या झाल्यानंतर गॅस बंद करा. कुकर थंड झाल्यानंतर झाकण उघडून वडीचे रोल बाहेर काढावेत. सुमारे ५ मिनिटांनी वडीचा रोल पोळपाटावर घेऊन, सुरीने वड्या पाडून घ्या.
नंतर गॅसवर तवा गरम होण्यास ठेवून, त्यावर एक पळी तेल टाका. तेल गरम झाल्यानंतर त्यावर कोथिंबीर वड्या मांडून सुमारे २ मिनिटं मध्यम आचेवर खरपूस भाजून घ्या. २ मिनिटांनी कालथ्याच्या साहाय्याने वड्या पलटी करून, त्यावर थोडं तेल टाका. तेल टाकल्यानंतर पुन्हा वड्या २ मिनिटं खरपूस भाजा. नंतर गॅस बंद करा. गरमागरम कोथिंबीर वडी तयार.