चिंताजनक! कोरोनाने ६ महिन्यांचा मोडला रेकॉर्ड

नवी दिल्ली : कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना रुग्णसंख्येत सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत या कोरोना संसर्गाचे ३०९५ नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह, सक्रिय प्रकरणांची संख्या देखील १५२०८ वर पोहोचली आहे. गेल्या सहा महिन्यांतील दैनंदिन प्रकरणांची ही सर्वाधिक संख्या आहे.

महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ६९४ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या ३०१६ इतकी झाली आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत असल्यानं ही राज्यासाठी धोक्याची घंटा आहे. राज्यात कोरोना, एच१ एन१, एच३ एन२ आणि इन्फ्लूएन्झा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.

गुरुवारी, दिल्लीत कोरोना संसर्गाची २९५ नवीन प्रकरणे नोंदवली गेली आणि संसर्गाचा दर १२.४८ टक्के होता. आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. दिल्लीत गेल्या वर्षी ३१ ऑगस्टनंतर बुधवारी एका दिवसात सर्वाधिक ३०० रुग्ण आढळले आणि दोन जणांचा मृत्यू झाला. संसर्ग दर १३.८९ टक्के नोंदवला गेला.