नवी दिल्ली : भारतात सध्या कोरोनाचा वेग दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे. गेल्या २४ तासात कोरोना व्हायरसचे ५३३५ नवीन रुग्ण आढळले आहेत. यासोबतच देशात सक्रिय रुग्णांची संख्याही वाढली आहे. सध्या, कोरोना बाधित सक्रिय रुग्णांची संख्या २५,५८७ झाली आहे. गेल्या वर्षी २३ सप्टेंबरनंतर प्रथमच दैनंदिन प्रकरणांनी ५,००० चा टप्पा ओलांडला आहे.
गेल्या २४ तासांत ६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या बाबतीत, दिल्ली, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, हरियाणा, तामिळनाडू आणि कर्नाटक विशेषतः प्रभावित असल्याचे दिसते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, एका दिवसात कर्नाटकात २, महाराष्ट्रात २ आणि पंजाबमध्ये १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. याशिवाय केरळमध्येही एका रुग्णाला आपला जीव गमवावा लागला आहे.
भारतातील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट २.८९ टक्के आहे. गेल्या २४ तासांत २ हजार ८२६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आणि तेथे १९९३ लोकांनी डोस घेतला. भारतात आतापर्यंत ९२.२३ कोटी लोकांची चाचणी करण्यात आली आहे. बुधवारी कोरोना विषाणूच्या संसर्गाची ४,४३५ नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर, देशात आतापर्यंत संक्रमित लोकांची संख्या ४,४७,३३,७१९ झाली आहे. गेल्या १६३ दिवसांत नोंदवलेल्या दैनंदिन प्रकरणांची ही सर्वाधिक संख्या होती. त्याच वेळी, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या २३,०९१ वर पोहोचली आहे.