महाराष्ट्रात कोरोना वाढतोय; ३ जणांचा मृत्यू; या आहेत नवीन मार्गदर्शक सूचना

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. राज्यात आज एकूण १७६३ सक्रिय रुग्ण आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ८,६५,७१,६७३ कोरोना नमुना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी ९.४० टक्के नमुने हे पॉझिटिव्ह सापडले आहेत. राज्यात ३४३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर १९४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे पुणे शहरात आहेत. पुण्यात ५१० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ मुंबई, ठाण्याचा क्रमांक आहे. राज्यात कोरोनामुळे तीन रुग्णांचा मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पुण्यासह राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे केंद्र सरकारही सतर्क झाले आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोर्डवर आहे. राज्यात पुन्हा एकदा मास्क वापरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाच्या नव्याने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे की, श्वास घेण्यास त्रास, ताप आणि खोकला ५ दिवसांपेक्षा जास्त काळ राहिल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाचा वाढता धोका पाहता कोरोनाबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.