Corona patient ठाणे : महापालिका क्षेत्रात गेल्या दोन वर्षांपासून करोना संसर्ग आटोक्यात असतानाच, मंगळवारी शहरात एका तरुणीला करोनाची लागण झाल्याची बाब समोर आल्याने पालिका आरोग्य सतर्क झाली आहे. या रुग्णावर ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्रात ही तरुणी राहत असून ती आजारी असल्याने पालिकेच्या आरोग्य केंद्रात दवापचारासाठी आली होती. ताप, सर्दी आणि दमा असा तिला त्रास होता. तिथे तिची करोना चाचणी करण्यात आली असता, त्याचा अहवाल सकारात्मक आला.
तिला तातडीने कळवा येथील पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील विशेष कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील एनआयव्ही येथे पाठविण्यात येणार असून तेथील अहवालनंतरच करोनाचा कोणता व्हेरियंट आहे, याची माहिती समोर येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. या वृत्तास रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिरुद्ध माळगांवकर यांनी दुजोरा दिला आहे.