चिंता वाढवणारी बातमी! केंद्र सरकारकडून राज्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी

केरळमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लागण झालेला पहिला रुग्ण आढळून आला आहे. त्यानंतर केंद्र सरकार अलर्ट झालं आहे. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून राज्यांसाठी खबरदारीच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

केरळमध्ये कोरोना सब-व्हेरियंट JN.1 चे प्रकरण समोर आले आहे. 79 वर्षीय महिलेमध्ये हा विषाणू आढळून आला. ICMRचे महासंचालक डॉ राजीव बहल यांनी सांगितले की, 8 डिसेंबर रोजी तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील काराकुलम येथे हे प्रकरण आढळून आले. महिलेमध्ये इन्फ्लूएंझा सारख्या आजाराची (ILI) सौम्य लक्षणे होती.

केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, राज्यात आढळणारा कोविड-19 उप-प्रकार JN.1 चिंतेचे कारण नाही. नवीन व्हेरियंटबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना जॉर्ज म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी सिंगापूर विमानतळावर तपासण्यात आलेल्या भारतीय प्रवाशांमध्ये उप-प्रकार आढळून आला होता.

दरम्यान, येणारे काही दिवस सण-उत्सवांचे आहेत. त्यामुळे विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी काही खबरदारी घेण्याची गरज आहे, असं केंद्र सरकारच्या सूचनेमध्ये म्हणण्यात आलं आहे.
केंद्र सरकारच्या सूचनेमध्ये सांगण्यात आलंय की, जिल्हा पातळीवर रुग्णांचे सर्व्हेक्षण केलं जावं. यातील सर्दीसारखा आजार, श्वास घेण्यास अडचण अशा रुग्णांची ओळख करावी. सर्व जिल्ह्यांमध्ये आवश्यक टेस्टिंग कीट असल्याची खात्री करण्यात यावी.

कोरोना JN.1 व्हेरियंट हा पिरोलाचा भाऊबंध असल्याचं सांगितलं जातं. याचा पहिला रुग्ण अमेरिकेमध्ये सप्टेंबर २०२३ मध्ये आढळून आला होता. त्यानंतर चीनमध्ये डिसेंबर महिन्यात या विषाणूची लागण झालेले ७ रुग्ण आढळून आले होते.