कोरोना! केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले ‘हे’ आदेश

मुंबई : गेल्या तीन आठवड्यांपासून देशासह राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या २४ तासात ७८८ रूग्णांची भर पडली आहे. त्या पार्श्वभूमीवर रुग्णालये सज्ज ठेवण्यात येत आहेत. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने राज्यातील सर्व रुग्णालय प्रमुखांची दृकश्राव्य माध्यमातून बैठक घेऊन त्यांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.
फेब्रुवारीच्या मध्यापासून वाढत असलेल्या कोरोनामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आढावा बैठका सुरू केल्या आहेत. रुग्णालयात सध्या उपलब्ध असलेल्या खाटा आणि रुग्णांसाठी वापरात असलेल्या खाटा यांची माहिती संकलित करण्यात येत आहे.
रुग्णालयांना सज्जतेचे आदेश
 रुग्णालयांनी उपलब्ध प्राणवायूच्या साठ्याची माहिती घ्यावी, रुग्णालयात करण्यात येणार्‍या कोरोना चाचण्यांचे अहवाल संकेतस्थळावर अपलोड करावे, प्राणवायू सिलिंडर, पीएसए प्रकल्प, द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू, जीवन रक्षक प्रणाली, औषधांचा साठा, महिला आणि मुलांसाठी विशेष कक्षाची सुविधा, लसीकरणाची माहिती आणि कोरोना संदर्भातील अन्य स्वरुपातील माहिती संकेतस्थळावर अद्ययावत करण्यात यावी, अशा स्वरुपाच्या सूचना आरोग्य विभागाकडून राज्यातील सर्व रुग्णालय प्रमुखांना देण्यात आल्या आहेत.
रुग्णालयात मुखपट्टीची सक्ती
 रुग्णालयातील प्रत्येक व्यक्तीला मुखपट्टी वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. डॉक्टर, परिचारिका, कक्ष सेवक यांच्यासह तृतीय श्रेणी कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी या सर्वांना मुखपट्टी वापरणे आवश्यक असल्याचा सूचनाही रुग्णालय प्रमुखांना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे रुग्णालयामध्ये तापाच्या रुग्णांसाठी स्वतंत्र बाह्य रुग्ण विभाग सुरू करावा आणि प्राणवायूच्या दोन जम्बो सिलिंडरचा साठा करावा अशा सूचनाही दिल्या आहेत.