Corona Virus : भारतीयांसाठी दिलासादायक बातमी

Corona Virus: गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने चिंतेत वाढ केली होती. मात्र आज भारतीयांसाठी दिलासादायक बातमी आहे. देशामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. देशात गेल्या 24 तासांमध्ये 7 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन आकडेवारीनुसार, देशामध्ये गेल्या 24 तासांमध्ये 7,178 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. आता देशातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या ही 65,683 इतकी झाली आहे. तर देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 98.67 टक्के नोंदवला गेला आहे. अशामध्ये रविवारी कोरोना रुग्णांचा जो आकडा समोर आला आहे तो दिसाला देणारा आहे.

कारण गेल्या काही दिवसांपासून देशामध्ये 10 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद होत होती. अशामध्ये गेल्या 24 तासांत 7 हजार पार रुग्ण आढळल्यामुळे कुठे तरी कोरोना रुग्णात घट होऊन कोरोनाचा वेग मंदावला असल्याचे म्हणता येईल.

आरोग्य मंत्रालयाने रविवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार 10,112 नवे रुग्ण आढळले होते. ही रुग्णसंख्या लक्षात घेता आज जाहीर केलेल्या रुग्णसंख्येत तब्बल 3 हजारांनी घट झाल्याचे दिसून येत आहे.दरम्यान, देशामध्ये सतत कोरोना रुग्णांची होणाऱ्या वाढीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील सर्व राज्य सरकारला उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते.

त्याचसोबत नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.