Corona Virus : देशात सलग दोन दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांच्या आकड्यात घट होत असल्याचे चित्र पाहायाला मिळत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 6 हजारांपेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. हा आकडा गेल्या काही दिवसांपासून नोंद होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत कमी आहे.
भारतामध्ये गेल्या 24 तासांत 6,660 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये 9,213 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महत्वाचे म्हणजे देशातील सक्रीय रुग्णांचा आकडा कमी होत तो 63,380 ऐवढा झाला आहे. तर, सोमवारी देशातील सक्रीय कोरोना रुग्णांचा आकडा 65,683 इतका होता.
म्हणजे, सोमवारी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार 7,178 नवीन प्रकरणांची नोंद झाली होती. त्या तुलनेत आजचा कोरोना रुग्णांचा आकडा लक्षात घेतला तर देशातील कोरोना रुग्णांच्या आकड्यात बऱ्यापैकी घट झाल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, कोरोनापासून बचाव करण्यासाठी आणि वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी सरकारने नागरिकांना मास्कचा वापर अनिवार्य केला आहे. तसंच ज्यांनी अद्याप कोरोनाची लस घेतली नसेल त्यांनी तात्काळ लस घ्यावी असे आवाहन सरकारने केले आहे.