Submarine tourism : महाराष्ट्रातील २०१८ सालातील अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्रातील विविध भागाच्या पर्यटन विकासासाठी १ हजार कोटींच्या निधींची तरतूद करण्यात आली होती. यामध्ये सिंधुदुर्गात देशातील पहिली पाणबुडी उपलब्ध करून देण्यात येणार होती.
सिंधुदुर्गातील वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉक येथे समुद्रविश्व पाहण्यासाठी हा प्रकल्प राज्य शासन राबवणार होता. परंतु, हा प्रकल्प आता गुजरातच्या द्वारका येथे होणार आहे. यासाठी गुजरात सरकारने माझगाव डॉक लिमिटेडसह करार केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प गुजरातला गेल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील पहिलं पाणबुडी पर्यटन सिंधुदुर्गातून हलणार असल्याचा आरोप विरोधकांनी सरकारवर केला आहे. या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या सोबतच मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पाबाबत नागरिकांना आश्वासनही दिलं आहे.
काय म्हणाले आहे मुख्यमंत्री शिंदे ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की, ”खोट्या बातमीकांवर विश्वास ठेवू नका. हा आपल्या राज्याचा प्रकल्प आहे, तो राज्यातून बाहेर जाणार नाही.” असं स्पष्टपणे सांगत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे.