शिर्डी साई संस्थानचा मोठा निर्णय; आता भोजनप्रसादासाठी कूपन अनिवार्य

#image_title

शिर्डी ।  साईबाबा संस्थानने साई भक्तांसाठी एक मोठा निर्णय घेतला असून, आता भोजनप्रसादासाठी कूपन अनिवार्य करण्यात आले आहे. हे कूपन दर्शन रांगेतच भक्तांना वितरित केले जाणार आहेत. तसेच, भक्त निवासात राहणाऱ्या भाविकांनाही हे कूपन दिले जाणार असल्याचे साई संस्थानकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

गुन्हेगारी रोखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल

शिर्डीत काही दिवसांपूर्वी घडलेल्या दुहेरी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर साई संस्थानने हा निर्णय घेतला आहे. साई मंदिर परिसरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. खासदार सुजय विखे पाटील यांनी यावर चिंता व्यक्त करत साई संस्थानला उपाययोजना करण्याची विनंती केली होती. त्यानंतर तातडीने निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा : सावधान! सायबर ठगांचा नवा फंडा, बँक बॅलेन्सवर असा घालतात गंडा

आजपासून अंमलबजावणी सुरू

आजपासून पहाटेच्या काकड आरतीनंतर या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. याआधी साई प्रसादालयात थेट प्रवेश मिळत असे आणि कोणालाही मोफत भोजनाचा लाभ घेता येत होता. मात्र, आता केवळ अधिकृत कूपन असलेल्या भक्तांनाच प्रसादालयात प्रवेश मिळणार आहे.

दररोज ५०-६० हजार भाविकांचा लाभ

साई संस्थानच्या प्रसादालयात दररोज सुमारे ५० ते ६० हजार भाविक मोफत भोजनाचा लाभ घेत असतात. वाढती गर्दी आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा बदल आवश्यक असल्याचे प्रशासनाने सांगितले. यामुळे व्यवस्था अधिक सुटसुटीत होईल आणि अनधिकृत प्रवेशावरही आळा बसू शकतो, अशी अपेक्षा आहे. साई भक्तांसाठी हा बदल मोठा असला तरी, अधिक चांगल्या व्यवस्थापनासाठी आणि सुरक्षेसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.