नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांना ज्या आमदार, खासदारांनी पाठिंबा दिला त्यांच्याविरोधात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांनी आक्षेपार्ह विधाने केली होती. त्यावर खासदार राहुल शेवाळे यांनी दिल्ली हायकोर्टात मानहानीचा दावा दाखल केला आहे. ही याचिका दिल्ली हायकोर्टाने दाखल करून घेत तिन्ही नेत्यांना प्रत्यक्ष कोर्टात आवश्यक ती कागदपत्रांसह हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे या तिन्ही नेत्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेच्या ४० आमदार, १३ खासदारांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला. त्यानंतर सातत्याने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत या आमदार-खासदारांवर आक्रमक टीका करत आहेत. अनेक ठिकाणी खोके उल्लेख करून डिवचण्यात येते. आजही सोशल मीडियावर शिंदे गटातील आमदार,खासदारांवर केलेली विधाने आहेत. त्यामुळे दिल्ली हायकोर्टाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मविरोधातही नोटीस काढली आहे. या पोस्ट का हटवण्यात आल्या नाहीत असा खुलासा कोर्टाने मागितला आहे.
या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या १७ एप्रिलला दिल्ली हायकोर्टात पार पडणार आहे. दिल्ली हायकोर्टाच्या आजच्या सुनावणीत मानहानीच्या दाव्याची याचिका दाखल करण्यात आली. राहुल शेवाळे यांच्याकडून बाजू मांडणार्या वकिलांनी कोर्टात ठाकरेंकडून केलेले बदनामीकारक विधाने सादर केली. या विधानाचे गांभीर्य ओळखून कोर्टाने ही याचिका स्वीकारली. न्यायालयाने प्रतिवाद्यांना नोटीस बजावत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात मनाई आदेश काढू नयेत यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.