ऑलिम्पिकसाठी पात्र ठरतील केवळ हे क्रिकेट संघ; वाचा काय आहेत निकष

मुंबई : ऑलिम्पिकच्या इतिहासाचा विचार केल्यास आतापर्यंत केवळ एकदाच क्रिकेटचा या स्पर्धेत समावेश झाला होता. त्यात केवळ दोन संघच सहभागी झाले होते. तेव्हा ब्रिटनच्या संघाने फ्रान्सला पराभूत करून सुवर्णपदक जिंकले होते. आता तब्बल १२८ ऑलिम्पिकमध्ये वर्षांनंतर क्रिकेटचं पुनरागमन होणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने मंगळवारी मुंबईत झालेल्या मतदानानंतर क्रिकेटचा ऑलिम्पिक खेळांमध्ये समावेश करण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. २०२८ मध्ये लॉस एंजिलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे सामने खेळले जाणार आहेत.

२०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या संघांबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. आयसीसीने दिलेल्या प्रस्तावानुसार आयसीसीच्या क्रमवारीत पहिल्या सहा क्रमांकावर असलेल्या संघांनाच ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यासाठी क्रिकेट संघांना निर्धारित कालावधीमध्ये पहिल्या सहा संघांमध्ये आपलं स्थान राखावं लागणार आहे.

आयसीसी २०२८ च्या ऑलिम्पिकसाठी रँकिंगचा एक कट ऑफ टाइम निर्धारित करणार आहे. त्या आधारावर ऑलिम्पिक खेळणाऱ्या सहा संघांची नावं निश्चित होतील. सध्याची टी-२० क्रमवारी पाहिल्यास भारताचे पुरुष आणि महिला असे दोन्ही संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकतात. दरम्यान, आयओसीचे स्पोर्ट्स डायरेक्टर किट मेकेनॉन यांनी सांगितले की, पात्रतेच्या निकषांवर अंतिम निर्णय हा २०२५ मध्ये घेतला जाईल.

सध्याच्या पुरुष क्रमवारीचा विचार केल्यास भारत पहिल्या, इंग्लंड दुसऱ्या, न्यूझीलंड तिसऱ्या, पाकिस्तान चौथ्या, ऑस्ट्रेलिया पाचव्या आणि दक्षिण आफ्रिका सहाव्या क्रमांकावर आहे. तर महिला टी-२० क्रमवारीचा विचार केल्यास ऑस्ट्रेलिया पहिल्या, इंग्लंड दुसऱ्या, न्यूझीलंड तिसऱ्या, भारत चौथ्या, दक्षिण आफ्रिका पाचव्या आणि वेस्ट इंडिज सहाव्या क्रमांकावर आहे.