ब्रेकिंग न्यूज : मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल, वाचा सविस्तर…

बीड : मनोज जरांगे पाटील यांच्यावर बीडच्या शिरूर आणि अमनेरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. मराठा आरक्षणासाठी विनापरवाना रास्तारोको आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांकडून जरांगे यांच्यावर गुन्हा नोंद केलाय. मनोज जरांगे यांच्या सूचनेनुसार विविध ठिकाणी रास्ता रोको केल्याप्रकरणी मराठवाड्याचा विचार करता तब्बल १०४१ जणांवर तर बीड जिल्ह्यातल्या ४२५ जणांवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

जरांगे यांच्या सूचनेनुसार राज्यभरातील विविध ठिकाणी मराठा समाज बांधवांच्या वतीने रास्ता रोको करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर विना परवानगी रास्ता रोको करून वाहतुकीला अडथळा केल्याप्रकरणी जरांगे यांच्यासहित त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सरकारकडून सुरू करण्यात आली आहे.

सरकारकडून जरांगे यांना जोरदार प्रत्युत्तर

मनोज जरांगे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांना सरकारच्या वतीने रविवारी जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. ‘आंदोलनकर्त्यांना कायदा हातात घेता येणार नाही. सरकारने संयम ठेवलेला आहे. संयमाचा अंत पाहू नका’, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांना दिला. तर काहीही बोलले तरी खपते, असे कोणी समजू नका, कायदा सर्वांना सारखा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरागेंना खडसावले.