Jalgaon Crime News : पोलिसांच्या नाकावर टिच्चून गुन्हेगारी सुरूच, आता तिघांनी युवकाला संपवलं; वर्दीचा धाक संपला?

---Advertisement---

 

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात खूनाच्या घटनांनी उग्र रूप धारण केले आहे. अशात पुन्हा एका ४० वर्षीय युवकाचा खून करण्यात आला आहे. भुसावळच्या कंडारी येथे किरकोळ वादातून रविवार, ५ रोजी रात्री १० ते ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. जितेंद्र राजेंद्र साळुंखे -कोळी (४०, रा. गेंदालाल मिल, जळगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र राजेंद्र साळुंखे -कोळी (४०) हा जळगावात पत्नी, तीन मुलांसह राहत होता. हातमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. जळगावच्या माजी महापौरांचा मुलगा व इतर दोघांसोबत जितेंद्र हा भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे एका कामानिमित्त गेला होता.

तिथे एका हॉटेलवर मद्यपान केल्यानंतर चौघांमध्ये वाद सुरू झाले. वादातून हाणामारी झाली. यानंतर जितेंद्र याला इतर तिघांनी धारदार शस्त्राने वार करून जागीच संपवले. जितेंद्रला खासगी रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.

माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी व रुग्णालयात पोहचले. जितेंद्र यांचा मृतदेह सरकारी रुग्णालयात हलवण्यात आला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, पोलिस निरीक्षक राहुल वाघ, पीएसआय इकबाल सय्यद यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेची टीम पोहोचली होती.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपींच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासात मुसक्या आवळल्या असून, राजू उर्फ बाबू अशरक सपकाळे (वय ३८, रा. कांती चौक, शिवाजी नगर, जळगाव) आणि मयूर उर्फ विक्की दिपक अलोने (वय ३२, रा. बारसे नगर, शिवाजी नगर, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या दोघा संशयित आरोपींचे नाव आहे.

पोलीस यंत्रणेपुढे मोठे आव्हान


गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात खून, हल्ले आणि गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अर्थात दररोज घडणाऱ्या खुनांच्या घटनांमुळे पोलीस यंत्रणेची कार्यक्षमता आणि कायदा-सुव्यवस्थेवरील नियंत्रणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस कायदा-सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी काय ठोस पाऊले उचलणार? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---