जळगाव : अल्पवयीन गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे धक्कादायक घटना जळगावच्या पिंपळगाव पोलीस ठाणे हद्दीत समोर आली आहे. १६ वर्षाची गतीमंद अल्पवयीन मुलगी चार महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे . दिलेल्या फिर्यादीनंतर पिंपळगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात 376 आणि पोक्सोसह इतर विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलगी गतीमंद असल्याचा फायदा घेऊन अज्ञात आरोपी पीडितेवर मागील अनेक महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करत होते, मात्र ही अल्पवयीन मुलगी चार महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे.
पोलीस सूत्रानुसार, पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी वास्तव्याला आहे. जन्मापासून ती गतीमंद असल्याने तिला काहीही समजत नाही. दरम्यान, तिच्या गतीमंदाचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने गेल्या तीन ते चार महिन्यांपासून तिच्यावर अत्याचार केला.
दरम्यान तिच्या पोटाचा आकार वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या आईवडीलांनी तिला तपासणीसाठी शासकीय रूग्णालयात दाखल केले. दरम्यान, पिडीत मुलगी ही चार महिन्याची गर्भवती असल्याचे समोर आले. पीडित अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल मोरे करीत आहे.