Crime News : भररस्त्यात प्रियकराने प्रेयसीची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, प्रेयसीची हत्या करतानाचा लाइव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दिवसाढवळ्या हत्येचा थरार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी संशयीत आरोपी प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरती यादव असे हत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रेकअपच्या रागातून आरोपीने प्रेयसीची हत्या केली आहे. अगदी रस्त्याच्या मधोमधच आरोपीने तिच्यावर वार केले. तिच्यावर वार करत असताना तो सतत माझ्यासोबत असं का केलं ? असा प्रश्न विचारत होता, असं प्रत्यशदर्शींनी सांगितले आहे. मात्र भर रस्त्यावर पादचाऱ्यांची रहदारी सुरू असताना हा प्रकार घडला. व्हायरल व्हिडिओमध्ये अनेक लोक रस्त्यावरून जात आहेत, मात्र कोणीही त्याला अडवण्याचा प्रयत्न केला नाही. तेथून अनेक वाहनेही जात आहेत, मात्र यावेळी कोणीही त्या तरूणाला थांबवले नाही. काहीजण या घटनेचा व्हिडिओ शूट करताना दिसत होते.
व्हिडिओत दिसत आहे की, तरुणी रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आहे. तर, आरोपी तिच्या चेहऱ्यावर हात फिरवताना दिसत आहे. पोलिसांनी तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपासणी सुरू आहे. वसई पूर्व चिंचपाडा परिसरात आज सकाळी साडे आठच्या सुमारास ही घटना घडली. आरती यादव ( 20) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून रोहित यादव असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
वसईच्या या घटनेने दिल्लीच्या घटनेची पुनरावृत्ती झाल्याचे बोलले जात आहे. दिल्लीत प्रियकराने 16 वर्षांच्या प्रेयसीला चाकूने भोसकले होते. आरोपीने तरुणीवर चाकुचे 40 वार केले होते. जिथे हत्याकांड घडले तिथे लोक आजूबाजूने जात होते, मात्र काहीच घडलं नाही अशा अविर्भावात दुर्लक्ष करुन निघून जात होते. कोणीही धाडस करत अल्पवयीन मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला नव्हता. आता तब्बल एक वर्षांनंतर वसईतदेखील घडलेल्या या घटनेने दिल्ली हत्याकांडचा घटनाक्रम पुन्हा चर्चेत आला आहे.