Crime News : सार्वजनिक ठिकाणी दोन जणांना घातल्या गोळ्या; जमावाने पकडले अन् केली बेदम मारहाण

गावकऱ्यांच्या जमावाने एका तरुणाची बेदम मारहाण केली. दोन तरुणांवर गोळ्या झाडून हा तरुण पळून जात होता. कुख्यात गुन्हेगार भूषण शर्मा असे मृताचे नाव असून तो एकमा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रित गावात राहणारा आहे. त्याच्यावर दरोडा, खून, मारहाण या कलमांखाली सुमारे डझनभर गुन्हे दाखल आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला. या घटनेत गोळ्या लागल्याने जखमी झालेल्या दोन्ही तरुणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

छपरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी एकमा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परसागढ बाजारात ही घटना घडली. पोलिसांनी सांगितले की, विभूती पटेल (18) आणि मन्नू पटेल (18) अशी जखमी तरुणांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमागचे कोणतेही ठोस कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, भूषण हा परसागढ बाजारात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. येथेच त्यांचा विभूती आणि मन्नू यांच्याशी काही मुद्द्यावरून वाद झाला. याचा राग येऊन भूषणने खिशातून पिस्तूल काढून दोघांवर गोळ्या झाडल्या. यानंतर तो घटनास्थळावरून पळू लागला.

गोळीबाराचा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी भूषणला घेरले आणि त्याचा पाठलाग करून त्याला एवढी मारहाण केली की त्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून भूषणच्या मृतदेहाचा पंचनामा केला. भूषण हा वॉण्टेड गुन्हेगार असून त्याच्यावर खून, दरोडा, प्रवाशांचे अपहरण, चोरी, डकैती आदी अनेक गुन्हे दाखल असल्याचे सांगितले. पोलीस बराच वेळ त्याचा शोध घेत होते.

याआधी गुरुवारी संध्याकाळी बिहारमधील बेगुसराय येथील रूग्णालयात एका कुख्यात गुन्हेगाराला कर्मचार्‍यांनी मारहाण करून ठार केले. चंदन कुमार सिंह असे या गुन्हेगाराचे नाव असून तो चकिया पोलिस स्टेशन परिसरातील सिमरिया गावचा रहिवासी आहे. या गुन्हेगारावर अनेक पोलीस ठाण्यात 10 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सांगितले की, चंदन एका रुग्णासोबत रूप नगर गावात असलेल्या नर्सिंग होममध्ये गेला होता. येथे त्याचा उपचाराबाबत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी वाद झाला. या वादात कर्मचाऱ्यांनी चंदनला बेदम मारहाण केली, त्यामुळे चंदनचा मृत्यू झाला.