Crime News : ४५ वर्षीय इसमाचा गळा आवळून खून; अडावदसह परिसरात खळबळ

अडावद, ता.चोपडा : येथील हजरत पीर पाखरशाह बाबांच्या दर्ग्यासमोरील मोकळ्या जागेत एका ४५ वर्षीय इसमाचा खून झाला. ही घटना रविवार, १ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे अडावदसह परिसरात खळबळ उडाली आहे.

हजरत पीर पाखरशहा बाबांच्या दर्ग्यासमोर मोकळ्या जागेवर एका इसमाचा खून झाल्याची वार्ता रविवार, १ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास गावात वाऱ्यासारखी पसरली. घटनेची माहिती पोलीसांना मिळताच अडावदचे सपोनि प्रमोद वाघ, पोउनि राजु थोरात, भरत नाईक, भुषण चव्हाण, गणेश बोरसे, सागर बागुले, संजय माळी यांनी घटनास्थळी धाव घेतली व मयताची ओळख पटविण्याचे आवाहन केले.

काही वेळातच मयताची ओळख पटून सदर इसम हा पाटचारी परिसरात राहणारा जगदिश फिरंग्या बारेला (सोलंकी) (४५) असल्याचे उघडकीस आले. सदर इसमाच्या डोक्यावर व अंगावर गंभीर जखमेच्या खुणा असल्याने तसेच गळ्याभोवती फास आवळल्याची निशाण दिसल्याने कुणीतरी अज्ञातांनी रात्री जगदिशचा निर्घून खून केल्याचे समोर आले आहे.

श्वान पथकास पाचारण
घटनेचा मागोवा घेण्यासाठी सपोनि प्रमोद वाघ यांनी जळगाव येथील श्वान पथकाला पाचारण केले. काही वेळातच हे.काँ. निलेश झोपे, पो.ना. प्रशांत कंखरे हे ‘जंजीर’ नामक श्वानासह घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथकाने संशयीत कुठल्या दिशेने पळाले तो माग दाखविला. या आव्हानात्मक घटनेत यात पोलिसांना खूनाबाबत काही धागेदोरे मिळतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
 घटनेची माहिती मिळताच चोपड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेवून घटनेचा आढावा घेत अडावदला दिवसभर तळ ठोकला. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोउनि गणेश वाघमारे, अनिल जाधव, ठसे तज्ञ सपोनि फड हे दाखल झाले. ठसे तज्ञांनी घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुरावे घेतले. या रहस्यमय खूनाच्या घटनेचा तपास लावण्यासाठी पोलीसांनी तपासचक्रे वेगाने फिरविली असून घटनास्थळी पोलिसांना एम.पी.४६ एम. एल. ६८८९ या क्रमांकाची मोटरसायकल मिळून आली आहे. तसेच काही संशयीतांना चौकशीकामी ताब्यात घेतले आहे.