---Advertisement---
धुळे : सोशल मीडियावर गुन्हेगार आणि गुन्हेगारीला प्रोत्साहन देणाऱ्या तीन इन्स्टाग्राम अकाउंटधारकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मयत रफिउद्दीन शेख उर्फ गुड्या आणि विक्रम श्यामराव गोयर उर्फ विक्की बाबा गोयर यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे उदात्तीकरण करणारे रील आणि पोस्ट्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. त्यानुसार मंगळवारी वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी, नरडाणा पोलिस ठाण्यात जयप्रकाश संजय देसले (रा. माळीच, ता. शिंदखेडा) याच्याविरूद्ध आणि चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात अविस सइद शेख (रा. जनता सोसायटी, धुळे) याच्याविरूद्ध, तर देवपूर पोलिस ठाण्यात परवेझ इस्माइल पठाण (रा. खाटकीवाडा, धुळे) याच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तिन्ही गुन्ह्यांचा तपास संबंधित पोलिस स्टेशन अंतर्गत सुरु आहे जामिनावर सुटलेल्या आरोपींचे जल्लोष, मिरवणूक, शस्त्रप्रदर्शन, फटाके, डी. जे. आणि समाजात दहशत पसरवणारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणे कायद्याने गुन्हा आहे. सायबर पोलिसांचे अशा प्रकारच्या कृत्यांवर बारीक लक्ष असून, असे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
समाजातील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी अशा प्रकारच्या कृत्यांपासून दूर राहावे आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे यांनी केले आहे. असा प्रकार आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.