सावरकरांवर टीका; राहुल गांधींमुळे शिवसेनेची पुन्हा गोची

मुंबई : ‘भारत जोडो’ यात्रेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केल्याने वाद निर्माण झाला आहे. राहुल गांधींच्या टीकेनंतर भाजपा नेते संताप व्यक्त करत असताना सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनींही प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी बाळासाहेंबाचा संदर्भ देत शिवसेनेला राहुल गांधींपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. मणिशंकर अय्यर यांनी सावरकरांचा अपमान केला होता, तेव्हा बाळासाहेबांनी मुंबईत पाय ठेवू देणार नाही असं सांगितलं होतं. शिवतीर्थावरच जोडे मारो आंदोलन झालं होतं. पण दुर्दैवाने आज त्याच शिवसेनेचे वारस वारंवार सावरकरांचा अपमान करणार्‍या राहुल गांधींबरोबर पदयात्रा काढत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी पत्रकार परिषद घेत राहुल गांधींच्या टीकेला उत्तर दिलं आहे. आपण राहुल गांधींविरोधात पोलीस तक्रार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. क्रांतीकारकांशी राहुल गांधी यांचं काही देणंघेणं नाही. पण चंद्रशेखर आझाद, सावरकर देशद्रोही असल्याचं ट्वीट त्यांनी केलं होतं. याविरोधात मी भोईवाडा कोर्टात दाद मागितली होती. कोर्टाने पोलिसांना तपास करण्याचा आदेश दिला होता. पण आता मी दुसरी तक्रार दाखल करणार आहे, असं रणजीत सावरकर यांनी सांगितलं आहे.

पुढे ते म्हणाले की ब्रिटिशांनीही कधी सावरकरांनी माफी मागितल्याचं म्हटलेलं नाही. पण दुर्दैवाने आपल्या देशात तसं बोललं जात आहे. आज बाळासाहेबांचा स्मतीदिन आहे. अशा पवित्र दिनीही नाना पटोले यांनी पुन्हा असेच आरोप केले आहे. त्यामुळे बाळासाहेबांचे वारसदार त्यांचं कसं स्वागत करतात हे मला पाहायचं आहे, असंही ते म्हणाले.

काँग्रेसबरोबर जावं लागलं तर माझं दुकान बंद करेन असं बाळासाहेब म्हणाले होते. पण आज त्यांच्या स्मृतिदिनी काँग्रेस नेते सावरकरांचा अपमान करतात. त्यांचं शिवसेने कसं स्वागत करते हे जनतेनेही पाहावं. आदित्य ठाकरे यांनी तर राहुल गांधींची गळाभेट घेतली. अशा व्यक्तीचा सहवासही तुम्ही टाळला पाहिजे. तुम्ही त्यांना ठामपणे आम्ही सावकरांचा अपमान सहन करणार नाही असं सांगितलं पाहिजे, असा सल्ला रणजीत सावरकर यांनी दिला आहे.