---Advertisement---
---Advertisement---
नंदुरबार : शहादा तालुक्यातील कळंबूसह परिसरात १२ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मका पिकाची लागवड केली आहे. मात्र, पाऊस नसल्याने मकासह अन्य पिकांची वाढ खुंटली असून, उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
परिसरात कोरडवाहू क्षेत्रात मकासह कापूस, बाजरी, तूर या पिकांची लागवड करण्यात आली आहे. जुलै महिना संपण्याच्या मार्गावर असून, या महिन्यात पाऊस न झाल्याने पिकांची वाढ खुंटली आहे.
मशागतीसह फवारणीची कामे आटोपली असून, पिकांना खतांची मात्रा द्यावी, यासाठी शेतकरी पावसाची वाट पाहत आहे. पुरेसा पाऊस व खतांची मात्रा न मिळाल्याने पिकांचे पोषण न झाल्याने वाढ थांबली आहे, तर बदलणाऱ्या वातावरणामुळे कापूस व मका पिकांवरती रोगराईचा प्रादुर्भाव वाढला आहे.
शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पिकांवरती खर्च केला असून, दोन आठवड्यांपासून पाऊस नसल्याने कोरडवाहू क्षेत्रातील पिके करपू लागली आहेत. वेळेवर पाऊस न झाल्यास हंगाम वाया जाण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
मका व तूर पिकांच्या क्षेत्रात वाढ
कमी खर्चात चांगले उत्पन्न येत असल्याने यावर्षी मोठ्या प्रमाणात मका पिकाच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. तसेच गेल्यावर्षी तुरीला चांगला भाव मिळाल्याने यावर्षी ही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात संकरित तूर लागवड केली आहे.