---Advertisement---
Jalgaon News : जळगाव शहरात गणराय विराजमान झाल्यानंतर आता प्रशासनासमोर अनंत चतुर्दशीचा सण उभा ठाकला आहे. अनंत चतुर्दशीला विसर्जन मिरवणूक मार्गावर होणारी प्रचंड गर्दी आणि रेटारेटीची समस्या दूर करण्याचे आव्हान आहे. ही गर्दी नेमकी टाळायची कशी? याबाबत स्वतः जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मनपाचे अधिकारी पाहणी करणार आहेत.
शहरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र गर्दीचे वातावरण आहे. गणेशोत्सवात कुठलेही विघ्न येऊ नये यासाठी पोलीस प्रशासन डोळ्यात तेल घालून नजर ठेऊन आहेत. गणपती पाहण्यासाठी शहरातील भाविक मोठ्या संख्येने सायंकाळी बाहेर पडतात. अनेक मंडळांसमोर तर लांबच लांब रांगा लागलेल्याचे चित्र दरवर्षी दिसते. गर्दी नियंत्रणाचे काम हे मंडळाचे असले तरी प्रशासनाची देखिल ती जबाबदारी आहे.
नवीपेठेत यात्रोत्सवात रेटारेटीचा प्रकार नवीपेठेत गणेशोत्सवानिमित्त यात्रोत्सव भरत असतो. याठिकाणी प्रचंड गर्दी होऊन रेटारेटीचे प्रकार घडत असतात. अशा महिला आणि लहान मुले पडऊन अपघाताच्याही घटना घडल्या आहेत. या परिसरात केवळ एक-दोन कॉन्टेबल तैनात करून उपयोग होत नाही. शिवाय मंडळे देखिल या गर्दीकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे याठिकाणी होणाऱ्या गर्दीला शिस्त लावण्यासाठी मंडळांसह प्रशासनाकडून उपाययोजना आवश्यक असल्याचे भाविकांचे म्हणणे आहे.
विसर्जन मार्गाची पाहणी
विसर्जनाच्या दिवशी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह मनपाचे अधिकारी विसर्जन मार्गाची पाहणी करणार आहेत. तसेच या मार्गातील खड्डे, काही इतर सुविधांचा आढावा घेतला जाणार आहे. नागरिकांना विसर्जन मिरवणूकीचा आनंद सोयीस्कररित्या घेता यावा यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर चर्चा होणार आहे.
विसर्जन मार्गावरील स्टॉलमुळे रस्ते अरुंद
विसर्जनाच्या दिवशी रांगेत निघणाऱ्या मिरवणूका बघण्यासाठी शहरासह जिल्हाभरातून नागरिक जळगावात दाखल होतात. सायंकाळी याच मार्गावर स्वागताचे स्टॉल्स देखिल लावले जातात. हे स्टॉल्स लावण्याची परवानगी मनपाकडून दिली जाते. मात्र या स्टॉल्समुळे रस्ते अरूंद होऊन नागरिकांना गर्दीतून वाट काढणे अशक्य होते. त्यामुळे महापालिकेने स्टॉल्सला परवानगी देतांना नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे.