Cyber Crime : पुण्यात सायबर गुन्हेगारांनी मोठा धुडगूस घातला आहे. या चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अशात आता चक्क एक पोलीसच सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकले आहेत. इतकेच नाही तर चोरट्यांनी पोलिसांच्या खिशातील ५ लाखांची रक्कमही लंपास केलीये.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांच्या जाळ्यात सापडलेले पोलीस शिपाई शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये वास्तव्यास आहेत. एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्या मोबाईलवर एक मेसेज पाठवून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी जाहीराती तसेच पोस्ट लाईक करून दिल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगितले. त्यामुळे त्यांना ही स्किम आवडली आणि ते सायबर चोरट्यांच्या जाळ्यात फसले.
त्या पोलीस शिपायांनी काम करायला सुरुवात केली आणि सुरवातीला त्यांना चांगला परतावा देण्यात आला. यानंतर मात्र हा परतावा बंद झाला आणि पोलीस शिपायांना गुंतवणुकीचे आमिष दाखविण्यात आले. ऑनलाइन कामात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगून सायबर चोरट्यांनी पोलीस शिपायांकडून वेळोवेळी चार लाख ९९ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने घेतले.
पैसे जमा झाल्यानंतर चोरट्यांनी त्यांचा मोबाइल बंद करून ठेवला. आपली फसवणूक झाली हे लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तसेच सापळा रचून आणि सूत्रांच्या माहितीने पुढील तपास सुरू आहे.