---Advertisement---

बापरे ! सैनिकाचा मोबाइल हॅक करून आठ लाखाला चुना; परस्पर साडेसात लाखाचे कर्ज घेऊन काढली रक्कम

---Advertisement---

जळगाव : भारतीय सैन्य दलातील शिपायाचा मोबाइल हॅक करून त्यांच्या बँक खात्यातून परस्पर आठ लाख पाच हजार रुपये काढून घेत फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विजय चिंधा राजपूत (४०, रा. चाळीसगाव) असे फसवणूक झालेल्यांचे नाव आहे. विशेष म्हणजे मोबाइलचा ताबा घेत परस्पर राजपूत यांच्या नावे सात लाख ४३ हजार रुपये ऑनलाइन कर्ज मंजूर करून घेत सायबर गुन्हेगाराने रक्कम वेगवेगळ्या खात्यात वळती केली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

चाळीसगाव येथील विजय राजपूत हैं भारतीय सैन्य दलात शिपाई म्हणून नोकरीला असून त्यांची जम्मू येथील रामबण येथे नियुक्ती आहे. जून महिन्यात त्यांच्याशी एका अनोळखीने संपर्क साधून सात लाख ४३ हजार रुपयांचे कर्ज हवे आहे का, असे विचारले. त्यास त्यांनी नकार दिला. त्यानंतर मात्र १ जुलै रोजी त्यांना त्यांच्या चाळीसगाव येथील स्टेट बँकेत असलेल्या खात्यातून १३ हजार १३६ रुपये डेबिट झाल्याचा मेसेज आला.

परस्पर कर्ज मंजूर

खात्यातून रक्कम वजा झाल्याने राजपूत हे सुटी घेऊन चाळीसगाव येथे आले. त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत चौकशी केली असता त्यांच्या नावावर सात लाख ४३ हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाले, त्याच्या हप्त्याची रक्कम म्हणून १३ हजार १३६ रुपये डेबिट झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. आपण कोणत्याही कर्जाची मागणी केली नसल्याचे त्यांनी बँकेत सांगितले असता त्यांना त्यांच्या खात्याचा तपशील दाखविण्यात आला. त्या वेळी त्यांना समजले की, १३ जून रोजी त्यांच्या खात्यावर सात लाख ४३ हजार रुपये कर्जाची रक्कम जमा झाली आहे.

मोबाइलचा अॅक्सेस घेऊन फसवणूक

या सर्व प्रकारात सायबर गुन्हेगाराने राजपूत यांच्या मोबाइलचा अॅक्सेस घेऊन ही फसवणूक केल्याचे समोर आले. या अॅक्सेसमुळेच त्याने खात्यातील रक्कम दोन वेगवेगळ्या बँक खात्यात वळती केली.

मोबाइलमध्ये बँकेचे अॅप

विजय राजपूत यांच्या मोबाइलमध्ये बँकेचे अॅप असून त्याद्वारे ते ऑनलाइन व्यवहारही करतात. याच मोबाइलचा सायबर गुन्हेगाराने अॅक्सेस मिळवून परस्पर कर्ज मंजूर करून घेत कर्जाच्या रकमेसह खात्यातील इतर रक्कमही काढून घेतली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---