Nashik Crime News : ऑनलाईन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून आता सायबर चोरट्यांनी शेतकऱ्यांना गंडा घालण्यास सुरुवात केली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेच्या नावाने बनावट लिंक पाठवून शेकडो शेतकऱ्यांची आर्थिक लूट झाल्याचे समोर आले आहे.
एकीकडे शेतकरी PM किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असताना, नाशिक जिल्ह्यात सायबर गुन्हेगारांकडून शेतकऱ्यांना बनावट लिंक पाठवली जात आहे. या लिंकवर क्लिक करताच त्यांच्या मोबाईलला हॅक करून बँक खात्यातून पैसे काढले जात आहेत.
हेही वाचा : Viral video : ‘यालाच म्हणतात संस्कृती’, सासू-सुनेच्या व्हायरल व्हिडिओवर मजेदार प्रतिक्रिया
सायबर गुन्हेगार सोशल मीडियावर PM किसानशी संबंधित असल्याचा दावा करून शेतकऱ्यांना एक फाईल पाठवतात. शेतकरी ती फाईल अधिकृत समजून उघडतात, मात्र यामुळे त्यांच्या मोबाईलमध्ये एक हॅकिंग प्रोग्राम ॲक्टिव्ह होतो आणि त्यांच्या बँक खात्यातील पैसे काढले जातात.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना
अनोळखी लिंकवर क्लिक करू नका – व्हॉट्सअॅप, मेसेज किंवा सोशल मीडियावरून आलेल्या कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका.
अधिकृत वेबसाइट वापरा – PM किसान योजनेची अधिकृत माहिती फक्त pmkisan.gov.in या वेबसाइटवरूनच घ्या.
फसवणुकीच्या कॉलला बळी पडू नका – जर कोणी तुम्हाला पीएम किसानच्या हफ्त्यासाठी पैसे भरण्यास सांगत असेल, तर ते नक्कीच फसवणूक आहे.
OTP व वैयक्तिक माहिती शेअर करू नका – कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत बँक खाते, OTP किंवा आधार क्रमांक शेअर करू नका.
ई-केवायसी फक्त अधिकृत पोर्टलवर करा – ई-केवायसी करण्यासाठी फक्त अधिकृत पोर्टल pmkisan.gov.in किंवा जवळच्या CSC केंद्राला भेट द्या.
फसवणुकीची शंका आल्यास काय करावे?
जर तुम्हाला अशा प्रकारच्या कोणत्याही फसवणुकीची शंका वाटत असेल, तर तात्काळ सायबर क्राइम हेल्पलाइन 1930 वर कॉल करा किंवा www.cybercrime.gov.in या वेबसाइटवर तक्रार नोंदवा.
शेतकऱ्यांनी अशा फसवणुकीपासून सतर्क राहून योग्य माहिती घेणे गरजेचे आहे. तुमचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी अधिकृत स्रोतांकडूनच खात्री करून पुढील पाऊल उचलावे.