सिलेंडर दरवाढ विधिमंडळात; वाचा काय घडले

मुंबई : राज्य सरकारच्या विधिमंडळ अधिवेशनाचा दुसरा दिवस हा महागाई आणि गॅस दरवाढीमुळे गाजला. विरोधकांनी आज पुन्हा पायर्‍यांवर गॅस दरवाढीचा निषेध करत घोषणाबाजी केली. गॅस दरवाढी कमी झालीच पाहिजे, अशा घोषणा यावेळी आमदारांनी केल्या. यावेळी, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह अनेक नेतेमंडळीही उपस्थित होती.

मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईने सर्वसामान्यांना मोठा झटका दिला आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे दर ५० रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे, आता मुंबईत सिलेंडरचे दर १,१०२.५० रुपये, नागपूरला १,१५४.५० रुपये, नाशिकला १,०५६.५० रुपये झाले आहेत. होळीपूर्वीच महागाईचे चटके सामान्य माणसाला बसले आहेत. त्यामुळे, विधिमंडळाच्या अधिवेशनातही याचे पडसाद पाहायला मिळाले. महाविकास आघाडीच्या आमदारांनी एकत्र येत विधानसभेच्या पायर्‍यांवरच घोषणाबाजी केली.

शेतकरीविरोधी सरकारचा धिक्कार असो, महिलाविरोधी सरकारचा धिक्कार असो, शेतमालाला भाव मिळालाच पाहिजे.. असे म्हणत वाढीव गॅस दरवाढीवरुन तीव्र संताप व्यक्त केला. महिला आमदारांनी गॅस सिलेंडरचे कागदी पोस्टर झळकावत सरकारचा निषेध नोंदवला.