डी. आर. हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

वैभव करवंदकर
नंदुरबार  :  येथील डी. आर. हायस्कूल मध्ये शैक्षणिक वर्ष 2023-24  चे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. अध्यक्षस्थानी नंदुरबार एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन ॲड. परीक्षित मोडक तर स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र सराफ, सचिव प्रशांत पाठक, मुख्याध्यापक पंकज पाठक, उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक पर्यवेक्षक विपुल दिवाण, हेमंत खैरनार हे उपस्थित होते.

सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन, नटराज मूर्ती चे पूजन, दीप प्रज्वलन संपन्न झाले. उद्घाटनपर भाषणात संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र सराफ यांनी कलाविष्कार हा जीवनाचा अविभाज्य घटक असून प्रत्येक विद्यार्थ्याने विद्यार्थी दशेत आपल्या कलेचे नैपुण्य दाखवायलाच हवे. यातूनच उद्याचे कलाकार घडतात असे सांगून कलाविष्कार या स्नेहसंमेलनास शुभेच्छा देऊन उद्घाटन झाले असे जाहीर केले व कार्यक्रमाला सुरुवात झाली.

कलाविष्कार या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी कराओके ट्रॅक वर गीतगायन, वैयक्तिक व समूह नृत्य, मराठी हिंदी इंग्रजी नाटिका, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन, विनोद, चुटकुले, बातम्या इत्यादी कलाप्रकार सादर करून सर्व कलारसिकांची दाद मिळवली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्काराला शाळेतील शिक्षक पालक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन वेगवेगळी बक्षिसे जाहीर केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर वृंद आणि विद्यार्थी यांनी सामूहिक नृत्य करून विद्यार्थ्यांमध्ये समरूप होऊन स्नेहसंमेलनाचा आनंद लुटला.

स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी स्नेहसंमेलन प्रमुख हेमंत खैरनार, कला शिक्षक देवेंद्र कुलकर्णी, नृत्य शिक्षक राहुल टिळंगे, दिनेश वाडेकर, प्रशांत पाटील, आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले. स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल मच्छले यांनी केले तर साऊंड सिस्टिम याचे संपूर्ण नियोजन मास्टर राजेश मच्छले यांनी पाहिले.