चाळीसगाव : तालुक्यातील रांजणगाव येथे बंद घरात प्रवेश करीत चोरट्यांनी तब्बल साडेपाच लाखांचा ऐवज लांबवल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना 2 ते 12 एप्रिलदरम्यान घडली. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घरे चोरट्यांना पर्वणी
सेवानिवृत्त शिक्षक मच्छिंद्र जगन्नाथ पाटील (59) हे रांजणगावात वास्तव्याला असून त्यांचा मुलगा पुण्यात वास्तव्यास आहे. मुलगी व मुलास प्लॉट घ्यावयाचा असल्याने मुलीने तिचे दागिने आपल्या आईकडे दिल्याने ते रांजणगाव येथील घराच्या लाकडी कॉटमध्ये ठेवण्यात आले होते व प्लॉट घेण्यासाठी मच्छिंद्र पाटील हे पत्नी मुलगा व मुलीसह पुण्याला गेल्याने घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली. बुधवार, 12 रोजी सकाळी सात वाजता मच्छिंद्र पाटील आल्यानंतर त्यांना घरफोडीचा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी मच्छिंद्र जगन्नाथ पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक लोकेश पवार हे करीत आहेत.
साडेपाच लाखांच्या ऐवजावर डल्ला
चोरट्यांनी जिन्याचे दरवाजाचे कुलूप तोडून आत घरात प्रवेश करून लाकडी कॉटमध्ये ठेवलेल्या डब्यातील एक लाख 20 हजार रुपये किंमतीचा 40 ग्रॅम वजनाचा सोन्याचा चप्पलहार, 48 हजार रुपये किंमतीची 16 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, 15 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे टोंगल, 30 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे बिस्कीट, सहा हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, 2800 रुपये किंमतीचे सात भार वजनाचे चांदीचे कडे, 2400 रूपये किंमतीचे हातातील कडे, 36 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत, 21 हजार रुपये किंमतीचे कानातील तोळे, 10 हजार 500 रुपये किंमतीचे कानातील तोळे, एक लाख 20 हजार रूपये किंमतीची सोन्याची पट्टी, 60 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन, 15 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे बिस्कीट, 39 हजार रुपये किंमतीचा सोन्याचा नेकलेस, 2800 रुपये किमतीचे चांदीचे जोडवे व 30 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन असा सुमारे पाच लाख 58 हजार 500 रुपये किंमतीचे 183.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे व 20 भार वजनाचे चांदीचे दागिणे लांबवण्यात आले.