नागपुर : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार असले, तरी ते नेमके कधी सुरु होणार? याबद्दल संभ्रम होता. अखेर आज (दि.२९) हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली. विधीमंडळाचे ७ डिसेंबरपासून अधिवेशन सुरू होणार आहे. मुंबईत झालेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास येत्या ७ डिसेंबरपासून नागपुरात सुरुवात होणार आहे. विधानसभा अध्यक्षांसह मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ७ डिसेंबरला सुरू होणारे हे अधिवेशन २० तारखेपर्यंत चालणार आहे. राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन सुरू असलेला संघर्ष, पुण्यातील ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरण, कंत्राटी भरती, राज्यातील दुष्काळजन्य स्थिती, पाण्याचा प्रश्न, कायदा-सुव्यवस्था, अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान या विषयांवरुन अधिवेशनात जोरदार गदारोळ होण्याची शक्यता आहे.
१९ डिसेंबर रोजी पुन्हा कामकाज सल्लागार समितीची अधिवेशनात बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या अधिवेशनावरुन नाराजी व्यक्त केली आहे. “किमान तीन आठवडे हे अधिवेशन चालावे, अशी आमची अपेक्षा होती. मात्र सरकारने पळ काढला आहे. सरकार राज्यातील प्रश्नांबाबत गंभीर दिसत नाही.” अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
नागपुरात १९२१ साली स्थापन झालेल्या विधान परिषद सभागृहाला १०० वर्षे पूर्ण झाली असल्याने यावर्षी हिवाळी अधिवेशनात ८ डिसेंबर रोजी स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान, अधिवेशानाचा कार्यकाळ वाढवण्याची मागणी विरोधीपक्षांकडून करण्यात आली आहे.