Datta jayanti 2023 : आज देशभरात दत्तजयंतीचा उत्साह पहायला मिळत आहे. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला. हिंदू धर्मानुसार भगवान दत्तात्रेयांची जयंती ही दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते.
भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा आंशिक अवतार मानले जातात. आजच्या दिवशी अनेक ठिकाणी दत्तजयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
आजच्या दिवशी भगवान दत्तात्रेयांची खास पूजा केली जाते. दत्तजयंतीनिमित्त पूजेचा शुभ मुहूर्त आणि महत्व जाणून घेऊयात.
दत्तजयंतीचा शुभ मुहूर्त
हिंदू पंचागानुसार, मार्गशीर्ष पौर्णिमा ही २६ डिसेंबरला सकाळी ५ वाजून ४६ मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता ही पौर्णिमा समाप्त होईल. सकाळच्या पूजेचा शुभ मुहूर्त हा ९ वाजून ४५ मिनिटांनी सुरू होणार असून १२ वाजून २१ मिनिटांनी हा शुभ मुहूर्त समाप्त होईल.
दुपारच्या पूजेचा शुभ मुहूर्त हा १ वाजून ३९ मिनिटांपर्यंत असणार आहे, तर सायंकाळच्या पूजेचा शुभ मुहूर्त हा ७ वाजून १४ मिनिटे ते ८ वाजेपर्यंत असणार आहे. या कालावधीमध्ये तुम्ही दत्तजयंतीची पूजा करू शकता.
दत्तजयंतीचे महत्व
भगवान दत्तात्रेयांची पूजा केल्याने ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या उपासने सारखेच फळ मिळते, अशी मान्यता आहे. कारण, भगवान दत्तात्रेयांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा अंश मानले जाते.
भगवान दत्तात्रेय हे महर्षी अत्री मुनी आणि देवी अनुसूया यांचे पुत्र आहेत. भगवान दत्तात्रेयामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचा समावेश आहे. त्यामुळे, भगवान दत्तात्रेयांमध्ये गुरू आणि ईश्वर या दोघांचे रूप आहे.
भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीला तिन चेहरे आणि सहा हात आहेत. विशेष म्हणजे भगवान दत्तात्रेयांचे २४ गुरू होते. केवळ त्यांची उपासना केल्याने त्रिमूर्ती (ब्रह्मा, विष्णू आणि महेश) यांची पूजा करण्यासारखे फळ प्राप्त होते, अशी देखील मान्यता आहे. त्यामुळे, दत्तजयंतीला अतिशय महत्व आहे.
भगवान दत्तात्रेयांच्या जयंतीनिमित्त विशेष पूजा करणाऱ्या भक्तांना अपार ज्ञान मिळते आणि योग्य प्रकारे जीवन जगण्याचे मार्गदर्शनही मिळते, असे देखील मानले जाते.