पाचोरा : शहरातील वरखेडी रोडवरील एका गोडावुनचे लाॅक तोडून एक लाख रुपये किंमतीच्या वस्तू चोरून नेणाऱ्या चोरट्यांना नागरिकांच्या सतर्कतेमुळे गस्तीवर असलेल्या डीबी पोलिस पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी 5 लाख 30 हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी चोरट्यांना पाचोरा न्यायालयात हजर केले असता 17 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पाचोरा शहरातील वरखेडी रोडवरिल कालिका पोल्ट्री फार्म जवळ फिर्यादी जयप्रकाश अमरलाल जाधवाणी (रा. गणपती नगर, जळगाव) यांचे दारुच्या रिकाम्या बाटल्या ठेवण्याचे गोडावुनमध्ये दि. १३ एप्रिल रोजी रात्री ११:४० वाजेच्या सुमारास मोहन धोंडु पाटील, सोनु प्रकाश पाटील (रा. गलवाडे ता. सोयगाव) व भुषण दिनकर म्हासरे ( रा. निंभोरा ता. सोयगाव) यांनी गोडावूनचे लाॅक तोडून आत प्रवेश केला.
काचेच्या, अल्युमिनियमच्या, प्लास्टिकच्या वेगवेगळ्या ब्रांडच्या खाली बाटल्यांची चोरी करताना रात्री पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गस्तीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके,पो. हे. काॅ. राहुल शिंपी, पोलिस काॅ. रणजित पाटील,योगेश पाटील,संदीप राजपूत वाहन चालक अशोक पाटील यांनी घटनास्थळावरून तिघांना ताब्यात घेतले.
जयप्रकाश जाधवाणी यांनी पाचोरा पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करीत आरोपी चोरट्यांना जेरबंद करण्यात आले असून त्यांच्या कडून 5 लाख रुपये किमतीचे वाहन क्र.(MH-19/CY-7480) व 30 हजार रुपये किमतीच्या बाटल्या रिकव्हर करण्यात आल्या आहेत.
सदर गुन्ह्यात अटकेतील वरील तिन्ही आरोपी चोरट्यांना पाचोरा न्यायालयात हजर केले असता 17 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. काॅ. राहुल शिंपी हे करीत आहेत.