तरुण भारत लाईव्ह : ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) बनावट औषधे बनवणाऱ्या 18 फार्मा कंपन्यांचे परवाने रद्द केले आहेत. डीसीजीआयने 20 राज्यांतील 76 कंपन्यांची तपासणी केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भातील माहितीनुसार डीसीजीआयने बनावट औषधे बनवणाऱ्या कंपन्यांविरुध्द मोहीम सुरु केली आहे. यात हिमाचल प्रदेशातील 70, उत्तराखंडमधील 45 आणि मध्य प्रदेशातील 23 कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ज्या कंपन्यांवर कारवाई करण्यात आली, त्यापैकी बहुतांश उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील आहेत. हिमालया मेडिटेक प्रायव्हेट लिमिटेडचा 30 डिसेंबर 2022 पासून उत्पादन करण्याचा परवाना निलंबित करण्यात आला आणि यावर्षी 7 फेब्रुवारी रोजी 12 उत्पादने तयार करण्याची परवानगीही रद्द करण्यात आली आहे.
अनेक देशांतून भारतीय औषधांमुळे होणारे मृत्यू आणि आजारांच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर हे छापे टाकण्यात आले. गेल्या महिन्यात गुजरातस्थित फार्मा कंपनी झायडस लाईफसायन्सेसने अमेरिकन बाजारातून गाउटवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जेनेरिक औषधाच्या 55 हजारांहून अधिक बाटल्या परत मागवल्या होत्या. औषध तपासणीत फेल ठरले. फेब्रुवारी महिन्यात चेन्नईतील एका औषध कंपनीने डोळ्यांच्या ड्रॉपची खेप परत मागवली होती. यूएस फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनने संभाव्य संसर्गामुळे अझ्रिकेअर आय ड्रॉप्स खरेदी किंवा वापरू नका असा इशारा दिला होता.