तरुण भारत लाईव्ह ।२९ जानेवारी २०२३। सोलापूर-विजयपूर महामार्गावरील केगाव बायपास येथून रस्ता ओलांडताना जवळील उड्डाण पुलावरून १४ काळवीट खाली कोसळले. यामध्ये काही काळविटांचा मृत्यू झाला असून काही काळवीट हे जखमी झाले आहेत.
हिरजच्या माळरानावरून सोलापूर शहरालगत असलेल्या शिवाजी नगर परिसरात १४ काळवीटांचा कळप येत होता. त्यावेळी मागुन येणाऱ्या वाहनाला अथवा पाठलाग करणाऱ्या कुत्र्याला घाबरून या काळपाने उड्डाण पुलावरून खाली उडी मारली. त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे. यापूर्वी त्याच परिसरात अनेकदा हरणांचा अपघात झाला आहे. शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. वन विभागाला त्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली आणि काही वेळातच उपवनसंरक्षक धैर्यशिल पाटील घटनास्थळी दाखल झाले. जखमी काळविटांना तातडीने पशुवैद्यकीय रुग्णालयात हलवले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जखमी काळविटांचीही प्रकृती नाजूक असल्याचेही सांगण्यात आले. या अपघातानंतर त्या मुक्या वन्यजीवांच्या मृत्यूला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.