रिल्स बनवणं जीवावर बेतलं! दरीत कोसळून मुंबईतील प्रसिद्ध रील स्टारचा मृत्यू

अलिबाग । हल्ली तरुणवर्ग सोशल मीडियावर रील्स बनवून प्रसिद्धी मिळवत आहे. मात्र बऱ्याच वेळा या स्टंटमुळे अनेक व्यक्तीचे जीवही गेले आहेत. असाच एक प्रकार आता अलिबागमधून समोर आला आहे. रील बनवीत असताना प्रसिद्ध ‘रील स्टार’आणि ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सरचा दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अन्वी कामदार असं मृत रील स्टारच नाव आहे.

अन्वी तिच्या काही सहकार्यासोबत मुंबईहून माणगावमधील कुंभे येथे पर्यटनासाठी गेली होती. मात्र दरीच्या एका कड्यावर रील बनवत असताना अन्वीचा तोल गेला आणि तब्बल ३०० फूट दरीत कोसळली. दरम्यान अन्वीच्या सहकार्यानी ही माहिती तात्काळ माणगाव पोलिसांना दिली. सर्व माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि स्थानिक बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र दरी अतिशय खोल असल्याने बचावकार्यात अनेक अडचणी येत होत्या. मात्र बचाव कार्यास मदत करण्यासाठी पोलिसांनी कोलाड तसेच माणगाव शिवाय महाड येथून अधिकचे प्रशिक्षिक बचाव पथकास बोलावले.

सर्वांच्या सहकाऱ्याने अन्वीला जखमी अवस्थेत स्ट्रेचरच्या साहाय्याने वर आणण्यात आले. त्यानंतर अन्वीला माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येणार होते मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाला. २७ वर्षांची अन्वी ही उच्च शिक्षित होती, तिने सीए केलं होतं. तिच्या अकस्मात आणि दुर्दैवी मृत्यूमुळे अनेकांना मोठा धक्का बसला असून हळहळ व्यक्त होत आहे