जळगाव : देशात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानुसार गेल्या अनेक दिवसांपासून याचे परिणाम जाणवायला लागले आहे. जळगाव जिल्ह्यात एका ३६ वर्षीय शेतमजुराचा शेतात काम करत असताना चक्कर येऊन पडून मृत्यू झाला. प्रेमसिंग कन्हीराम चव्हाण असे मृत शेतमजुराचे नाव आहे. दरम्यान, सदर शेतमजुराचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा येथे ही घटना घडली आहे. प्रेमसिंग कन्हीराम चव्हाण हे शेतीमजुरीचे काम व जेसीबी चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. दरम्यान, सोमवारी (ता. १०) सकाळी शेती कामासाठी गेले असता दुपारी शेतात काम करताना चक्कर येऊन खाली पडले व त्यांची शुद्ध हरपली.
सोबतच्या मजुरांनी त्यांना सावलीत आणून तोंडावर पाणी मारून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांची हालचाल होत नसल्याने तातडीने पिंपळगाव हरेश्वर येथे चव्हाण यांच्या रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी मृत घोषित केले.
दरम्यान, त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मयत प्रेमसिंग यांच्या पश्चात वृद्ध आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. घरातील करता पुरुष गेल्याने चव्हाण कुटुंबीय कमालीचे खचले आहेत.